Prit Tuzi Mazi 3- प्रीत तुझी माझी ३

Ticker

6/recent/ticker-posts

Prit Tuzi Mazi 3- प्रीत तुझी माझी ३

प्रीत तुझी माझी ३


माधव ऑफिस मध्ये पोहोचला आणि त्याला माधवीची आठवण झाली, त्याने मोबाईल काढून माधवीचा फोटो पाहिला, कालच्या पेक्षा ती आज जास्तच आकर्षित आणि सुंदर वाटू लागली माधवला. ते खरंच होत, माधवी once look नव्हतीच, पुन्हा more than once look अशीच होती. परत उलटून पाहण्या इतपत तीच सौंदर्य आकर्षक होत. माधवला तिला पाहण्याची उत्सुकता वाढत होती. त्याने निर्धार केला येत्या रविवार दिवशी भेट घ्यायचीच. माधवीला फोटोत पहिल्यापासून माधव संसार सुखाची स्वप्नं पाहू लागला होता. आणि त्याच्या मनाची घालमेल पण आता कमी झाली होती. नाहीतर बाहेर इतर मुलींकडे पाहून त्याचे मन सैरावैरा धावायचे ते आता बरेच कमी झाले होते. बाहेरच्या मुलींमध्ये माधवला माधवीच सौंदर्य उजवच वाटत होते. त्यामुळे त्याच मन माधवी शिवाय स्थिरावत नव्हतं. 

पुरुष मन कितीही राकट स्वभावाचे असले तरी स्त्रीची सौंदर्य झलक, त्या राकट मनाला घायाळ केल्याशिवाय राहत नाही. याला माधव पण अपवाद नव्हता. पूर्वी कालिदास काव्यात मन वाऱ्याच्या वेगाने ढगांवर स्वार होऊन आपला संदेश प्रेयसी पर्यंत पोहोचवण्याच्या कथा पाहिल्यास आज मोबाईलवर त्वरित संदेश प्राप्त होतो, पण भावनेची तीव्रता पाहिल्यास या दोहोंचा जमीन-अस्मानाचा फरक आहे. आज सर्व सोपे झाले आहे आणि भावना पण तितक्याच हलक्या झाल्या आहेत. 

माधव हा प्रेम प्रकारात एकतर्फी स्वभावाचा आहे, जिच्यावर प्रेम करायचे ते झोकून देऊन या स्वभावाचा माधव आहे. त्यामुळे समोरील व्यक्तीपण त्याच स्वभावाची असणार असे कल्पित विचार करणारा माधव होता. पण नियतीच्या पटलावर कोणते प्रेम स्वीकारायचे हे गूढ त्या नियतीलाच ठाऊक होते. माधव आणि माधवी ही त्या पाटलांवरील दोन प्यादे होते, कसे खेळायचे हे त्या नीतीला ठाऊक असावे. 

उलट माधवी एक स्त्री मन आहे, काय घ्यायचे आणि काय नाही याची नैसर्गिक जाणीव तिला आहे. मनाच्या चंचल लहरीत वाहून जाणारी होती की नव्हती हे अनाकलनीय आहे. पण कित्येक स्त्री मन हे पुरुषी सौंदर्याला आणि पराक्रमाला भाळलेले आहे. आतापर्यंत स्त्री मनाचा अभ्यास केल्यास असे दिसून येते, ती सौंदर्य, पराक्रम आणि धन-संपदा यांवर लुब्ध झालेली दिसते. यातील कोणत्याही एकावर तिचा तोल जाऊ शकतो. हा एक नैसर्गिक चंचलपणा प्रत्येक स्त्री मध्ये असतो. अर्थात हे तिच्या मन, यौवनवय आणि आकृष्ट होण्याचा काल यांवर बरेचसे अवलंबून असते. आणि कित्येकवेळा परिस्थितीवर अवलंबून असते. 

माधवने मोबाईल ऑन करून माधवीला कॉल केला, माधवीने पाहिले माधवचा कॉल आहे. पण कालचा प्रकार ती विसरली नव्हती. एक दोन कॉल होऊ दिले, त्यानंतर माधवीने कॉल रिसिव्ह केला.

माधव: "हाय, माधवी कशी आहेस?"

माधवी: "बरी आहे, तुम्ही?"

माधव: "काल ऑफिस मध्ये बिझी होतो, त्यामुळे तुझा कॉल नाही घेऊ शकलो. "

माधवी: "हो का, अहो मोबाईल बंदच होता तुमचा, किती कॉल केले माधव, आता कुठे बोलायला सुरुवात झालीय आणि तुमचा फोन बंद, माधव कसे वाटले असेल मला?"

माधव: "हो, हो माधवी मी तुझ्या भावना समजू शकतो, पण कामच असं महत्वाचं होत की मला नाईलाजाने मोबाईल स्विच ऑफ करावा लागला, सॉरी माधवी." 

माधवी: "झालं, सॉरी म्हटलं की सारं विसरून जाणे हा एकच अर्थ मला समजतो. माधव तुम्हा पुरुषांना आम्हा बायकांच्या भावना कधी समजायच्या देव जाणे. "

या अलंकारिक वाक्याला माधव चपापला, क्षणभर काय बोलावे हे माधवला समजेना. तसा तो बायकांसोबत बोलण्याचा हा पहिलाच 'प्रेमाचा' प्रसंग असावा, त्यामुळे माधव अडखळत होता. पण लागलीच त्याने सावरून मुद्द्याच्या विषयाला हात घातला.

माधव: "माधवी, ह्या रविवारी आपण भेटुयात, स्टेशन बाहेरच्या बस स्टॉपवर मी थांबतो, तू तिथे ये मग पुढच ठरवू कुठे जायचं." या सर्व बोलण्याने माधवीचा लाडीक रागाने बोलण्याचा चान्स हुकला, पण त्या भेटण्याच्या प्लान मुळे ती थोडी सुखावली.

माधवी: "अय्या, खरंच how sweet. ठीक आहे, मी येईन तिथे. म्हणजे परवाच की माधव, पुढे ठरवू काय करायचं".

माधव: "हो हो नक्की, माधवी तुझा फोटो पहिल्यापासून तू सारखी नजरेसमोर येतेस. माधवी किती छान फोटो आहे तुझा, मला जशी हवीशी वाटावी अगदी तशीच आहेस तू. फर्स्ट impression is last impression, आता याच्यापुढे कोणत्याही मुलीच मला आकर्षण राहणार नाही, इतकी तू सुंदर आहेस. सुंदर दिसतेस, दुसरी कुठलीही मुलगी मला पसंत पडणार नाही माधवी". 

माधवी: "हो हो अहो किती कौतुक करताय माझ्या सौंदर्याचं" 

माधव: "माधवी जे पाहून वाटलं ते मी बोलतोय."

माधवी: "एवढं सगळं बोलायला कशाला पाहिजे, एका वाक्यात सगळं बोलायला येत. बोला बघू."

माधव: "म्हणजे नेमकं कसं?"

माधवी: "काय माधव, pictur वगैरे पाहता की नाही, बोला बघू तसे."

माधवला आता थोड बोलण्याचा अर्थ समजला, पण त्याला धीर होईना, आत्तापर्यंत तो कोणालाच फिल्मी स्टाईल मध्ये बोलला नव्हता, माधवीच्या या आग्रहाने तो आश्चर्यचकित झाला होता. त्याला माहीत होते काय बोलायचे पण धीर होत नव्हता.

माधव: "माधवी आता नाही बोलू शकत मी, आपण प्रथम भेटुयात मग पुढे बघू."

माधवी: "काय माधव, एवढं एक वाक्य बोलायला तुम्हाला भीती वाटते. बोला ना,"   माधवी त्या वाक्यासाठी अधीर झाली होती, जिथे प्रेमाची पहिली पायरी या बोलण्याने होते. कित्येक नव-यौवन मुली या वाक्यासाठी झुरत असतात, त्यासाठी माधवी पण अपवाद नव्हती. तिची पण तीव्र इच्छा होत होती, की माधवने तिला i love u, बोलाव, पण तिच्या लक्षांत यायला लागलं माधव भिडस्त स्वभावाचा आहे. तो एवढ्या लवकर असे बोलणार नाही. आणि ते खरेही होते, माधव सरळ मार्गी होता. 

माधव: "आता रविवारी भेटतोय आपण, तिथेच बोलुयात."

माधवने मोबाईल बंद करून, तो ऑफिसच्या कामात लक्ष देऊ लागला. इकडे माधवी रविवारी कुठे जायचे या विचारात गढून गेली. तिला त्यांच्या विभागातील काही उद्याने माहित होती, काही मध्यम स्टाईल हॉटेल्स आणि रेस्टॉरंट माहीत होते. पण घरा जवळील हॉटेल किंवा रेस्टॉरंट ती टाळणार होती. कोणाच्या नजरेस न पडावे अशी तिची इच्छा होती. म्हणून तिने घरापासून दूर असणारे उद्यान आणि हॉटेल निवडायचे ठरवले आणि ती पूर्वी तिथे गेलेली होती मैत्रिणी सोबत, त्यामुळे तिने ते उद्यान नक्की ठरवले.

क्रमशः 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या